• गणित हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक. - प्रा. विष्णुकांत मत्ते

• गणित हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक. - प्रा. विष्णुकांत मत्ते 

हिंदुस्थान न्युज २४: ग्यानिवांत गेडाम 


 वरोरा : माणूस सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपत पर्यंत वेगवेगळ्या कामात विविध प्रकारे गणिताचा वापर करीत असतो. यामुळे गणित हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे असे प्रतिपादन आनंदनिकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. विष्णुकांत मत्ते यांनी केले. भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सदर कार्यक्रम तालुक्यातील सूमठाणा येथील सर्वोदय विद्यालयात गुरुवार दि. १९ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्राध्यापक विष्णुकांत मत्ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. सुनील गौरकार हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मराठी विज्ञान परिषद विभाग वरोरा चे कार्यवाह तथा आनंद निकेतन महाविद्यालय‌ वरोरा ‌ येथील प्रा. अविनाश ननावरे, लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय वरोरा येथील प्रा. निलेश मजगवळी उपस्थित होते. आपण गाव खेड्यात राहतो. यामुळे चांगले शिक्षण घेऊ शकत नाही. उच्च पदापर्यंत पोहोचू शकत नाही अशी भीती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असते. आपण बघितलं तर उच्च पदावर पोहोचलेल्या व्यक्तींपैकी मोठी संख्या ग्रामीण भागातून आलेल्या व्यक्तींचीच असल्याची अनेक उदाहरणे आपल्यापुढे आहे. यामुळे प्रथम ही भीती विद्यार्थ्यांनी मनातून काढून टाकली पाहिजे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विज्ञान विषयाकडे वळावे, यश तुमच्या पायाशी असेल असे प्रतिपादन प्रा. अविनाश ननावरे यांनी केले.
प्रा. निलेश मजगवळी यांनी आपल्या मनोगतातून भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच त्यांच्या जीवनात घडलेल्या अनेक प्रसंगांची आठवण यावेळी त्यांनी करून दिली. अत्यंत गरिबीतून जीवन जगत असताना श्रीनिवास रामानुजन यांनी त्यांची तल्लकबुद्धी असल्याने वेळेपूर्वी प्राथमिक शिक्षण‌ पूर्ण करून जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्यांनी गणितातील संशोधन आणि अनेक सिद्धांत ही जगाला दिलेली अमूल्य देणगी असल्याचे प्रा. मजगवळी यावेळी म्हणाले . सदर कार्यक्रमात गणिताची आवड निर्माण व्हावी म्हणून‌ प्रा. मजगावळी यांनी विद्यार्थ्यांना दोन कृती दिल्या होत्या. शाळेचे मुख्याध्यापक डॉ. सुनील गौरकार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी गणिताचा अधिकाधिक सराव करावा. त्यामुळे वैचारिक पातळी आणि निर्णय घेण्याची क्षमता यात वाढ होऊन मेंदूचा चांगला विकास होतो असे ते म्हणाले. सदर कार्यक्रमाचे संचालन सर्वोदय विद्यालयाचे गणित शिक्षक अनिल पाटील यांनी केले. तर उपस्थितांचे आभार विज्ञान शिक्षक संदीप खिरटकर यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेतील इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments