हिंदुस्तान न्यूज 24: रेखा चंडाले डिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर
गडचिरोली, (जिमाका) दि. 17: राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत, शासन निर्णय दि. 10 मार्च 2025 नुसार प्रशिक्षण कालावधी 11 महिन्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे.
सदर योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनांमध्ये नियुक्ती मिळाल्याच्या दिनांकापासून 5 महिन्यांचा अतिरिक्त कार्यप्रशिक्षण कालावधी अनुज्ञेय असेल. यामुळे सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांचा कार्यप्रशिक्षण कालावधी रुजू झाल्याच्या दिनांकापासून 11 महिने असेल, याची संबंधित आस्थापनांनी दक्षता घ्यावी.
तसेच, ज्या उमेदवारांचा 6 महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांना अतिरिक्त 5 महिन्यांसाठी कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी संबंधित आस्थापनांनी उमेदवारांना प्रशिक्षणासाठी रूजू होण्यासाठी सूचना द्याव्यात.
प्रशिक्षणार्थींनी 30 एप्रिल 2025 पूर्वी संबंधित आस्थापनेत रुजू व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल, बॅरेक क-2, युनिट क्रमांक-2, कॉम्प्लेक्स, पोलीस मुख्यालयासमोर, गडचिरोली या कार्यालयाशी संपर्क साधावा.
0 Comments